View All By Author / लेखकाचे सर्व लेख

Ashwini Rohit Kulkarni / अश्विनी रोहित कुलकर्णी

Ashwini Rohit Kulkarni is a Marathi historical novelist and researcher specializing in Maratha history. She is best known for her 2022 biographical novel Shrimant Peshwin Kashibai, which highlights the forgotten life of Peshwa Bajirao I's first wife. Beyond books, she shares historical insights as a columnist and through her digital platform, Cultural Legacy of Bharat.

अश्विनी रोहित कुलकर्णी या मराठा इतिहासाचा विशेष अभ्यास असलेल्या मराठी ऐतिहासिक कादंबरीकार आणि संशोधक आहेत. पेशवे बाजीराव पहिले यांच्या पहिल्या पत्नीचे विस्मृतीत गेलेले जीवन अधोरेखित करणाऱ्या 'श्रीमंत पेशवीण काशीबाई' (२०२२) या चरित्रात्मक कादंबरीसाठी त्या विशेष ओळखल्या जातात. पुस्तकांव्यतिरिक्त, त्या स्तंभलेखिका म्हणून आणि 'कल्चरल लेगसी ऑफ भारत' (Cultural Legacy of Bharat) या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ऐतिहासिक माहिती व विचार मांडत असतात.

Ashwini Rohit Kulkarni

Maharani Yesubai


महाराणी येसूबाई

Among the women of the Maratha era, if anyone experienced the greatest highs and lows after Rajmata Jijau Aisaheb, it was Maharani Yesubai. She witnessed the pinnacle of Hindavi Swarajya—the grand coronation ceremony of Shivaji Maharaj—and also saw with her own eyes the glorious triumphs as Swarajya transformed into an empire.

Maharani Yesubai

मराठेशाहीतील स्त्रियांमध्ये राजमाता जिजाऊ आईसाहेबांनंतर सर्वाधिक चढ-उतार जर कोणी पाहिले असतील तर त्या आहेत, महाराणी येसूबाई. येसूबाईंनी हिंदवी स्वराज्याचा अत्युच्च मानबिंदू असा शिवराज्याभिषेकाचा सोहळाही अनुभवला आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होत असतानाचे उच्चतम विजयही आपल्या डोळ्यांनी पाहिले.

Yesubai ably fulfilled the roles of both the Crown Princess and the Maharani of Swarajya. Yet, in later times, she also stoically endured the bitter agony of her husband's harrowing assassination and the self-imposed captivity she accepted for the sake of the kingdom's welfare. Reading the letter she wrote to the deity of Chinchwad while in captivity, and noting her constantly shifting places of confinement, gives one an idea of ​​just how arduous her life as a prisoner was.

येसूबाईंनी स्वराज्याची युवराज्ञी आणि महाराणी ही दोन्ही पदे समर्थपणे भूषविली. परंतु नंतरच्या काळात आपल्या पतीच्या क्लेशदायक हत्येचे आणि तदनंतर दौलतीच्या हिताचा विचार करून आपणहून पत्करलेल्या कैदेचे हलाहलसुद्धा त्यांनी तितक्याच समर्थपणे पचवले. येसूबाईंनी कैदेत असताना चिंचवडच्या देवांना लिहिलेले पत्र वाचताना आणि त्यांचे सतत बदलणारे मुक्काम पाहिल्यावर त्यांचे कैदेतील आयुष्य किती खडतर होते, याचा अंदाज येतो.

Just as Sita in the Ramayana had to renounce royal comforts and spend a testing period of her life in a humble forest hut, or as Yajnaseni (Draupadi) in the Mahabharata—despite being an Empress—faced the struggle for even two square meals a day during exile, Maharani Yesubai too had to confront dire, wretched conditions while held captive by Aurangzeb.

रामायणात सीतेला राजप्रासादाच्या सर्व सुखांचा त्याग करून जीवनातील परीक्षेचा काळ पर्णकुटीत व्यतीत करावा लागला किंवा महाभारतात याज्ञसेनीला सम्राज्ञी असूनही वनवासात दोनवेळच्या जेवणाची भ्रांत अनुभवावी लागली. त्याप्रमाणे महाराणी येसूबाईंना औरंगजेबाच्या कैदेत असताना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.

In a film like *Baahubali*, when the heroine Devasena voluntarily accepts captivity under a cruel enemy after her husband's death, waits unwaveringly for the right moment for twenty-five years, and finally returns to her rightful kingdom as the Queen Mother, the steely resolve of her character leaves a deep, lasting impression on us. Yet, Yesubai’s captivity was far more immense. Her adversary was vastly more powerful and the very embodiment of cruelty. It is a cruel irony of fate, then, that we do not seem to attach enough importance to elevating and celebrating her character. It would have been virtually impossible for any ordinary woman to achieve what Maharani Yesubai accomplished while in captivity—maintaining immense dignity and composure without ever compromising her life, honor, or faith.

बाहुबलीसारख्या सिनेमात जेव्हा नायिका देवसेना पतीच्या निधनानंतर एका क्रूरकर्मा शत्रूची कैद आपणहून पत्करते, पंचवीस वर्षे न खचता योग्य संधीची प्रतीक्षा करून स्वतःच्या हक्काच्या स्वराज्यात राजमाता म्हणून परतते, तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा करारीपणा आपल्याला दीर्घकाळ खोलवर जाणवत राहतो. येसूबाईंची कैद तर याहून कितीतरी मोठी होती. समोरचा शत्रू कित्येक पटींनी बलाढ्य आणि क्रौर्याचा कळस होता. तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करणे आपणास फार महत्त्वाचे वाटत नाही हा दैव दुर्विलास. अत्यंत धीरोदात्तपणे जीवित, अब्रू आणि धर्माशी कोणतीही तडजोड न करता महाराणी येसूबाईंनी कैदेत राहून जे साधले ते कोणत्याही सामान्य स्त्रीला साधणे केवळ अशक्य.

One of the reasons the Maratha chieftains were imbued with the fierce martial spirit needed to battle and subdue an enemy like Aurangzeb was the fact that Yesubai—a woman of resolute action—remained in captivity. For these brave warriors, who had sworn solemn oaths of loyalty to the Chhatrapati’s throne, liberating Yesubai and Shahu Maharaj was an imperative duty. To fulfill this primary obligation, Maratha swords continued to clash against Aurangzeb even when Swarajya faced near-total devastation; consequently, Aurangzeb’s dream of extinguishing Maratha power—after having annihilated other kingdoms—remained unfulfilled. Ultimately, he was forced to breathe his last in the very soil of Maharashtra, a defeated and desperate man.

औरंगजेबासारख्या शत्रूशी लढण्यासाठी, त्याला नामोहरम करण्यासाठी लागणारा अमाप रणज्वर मराठा सरदारांमध्ये भिनला त्याचे एक कारण कर्मयोगिनी येसूबाईंचे कैदेत असणे हे सुद्धा होते. छत्रपतींच्या गादीशी बेलरोटीच्या शपथा घेतलेल्या या शूरवीरांना येसूबाईंना आणि शाहू महाराजांना कैदेतून सोडवणे क्रमप्राप्तच होते. हे आद्यकर्तव्य पूर्ण करण्यासाठी मराठ्यांच्या परजलेल्या तलवारी स्वराज्याची पूर्ण वाताहत झालेली असतानाही औरंगजेबाविरुद्ध खणखणत राहिल्या आणि इतर पातशाह्यांना नामशेष केलेल्या औरंगजेबाचे मराठेशाही संपवण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. हताशपणे त्याला मराठी मातीतच प्राण सोडावा लागला.

In today’s world, one often witnesses an obsessive desire to install one’s children on the throne, regardless of their lack of understanding regarding politics or social welfare. Observing this makes one truly appreciate the historic significance of Yesubai’s decision: she chose not to succumb to maternal attachment but instead accepted captivity alongside Shahu Maharaj, entrusting the mantle of the Chhatrapati to her brother-in-law, Rajaram Maharaj.

आजकालच्या राजकारणांचा समाजकारणाची अजिबात जाण नसलेल्या आपल्या मुलांना गादीवर बसवण्याचा पराकोटीचा अट्टहास असतो. तो पाहिला की पुत्रमोहात न पडता शाहू महाराजांसोबत कैद पत्करून दीर राजाराम महाराज यांना छत्रपतीपदाची धुरा सोपविण्याचा येसूबाईंचा निर्णय पक्षीह ऐतिहासिक होता याची पुसटशी जाणीव होते.

Even amidst adverse circumstances, Yesubai resolutely made decisions in the best interest of the kingdom, keeping her personal grief locked away in a corner of her heart. She fully justified the trust Chhatrapati Sambhaji Maharaj had placed in her—symbolized by the royal seal bearing the inscription *'Shri Sakhi Rajni Jayati'* (Victory to the Queen)—demonstrating remarkable fortitude. Dr. Sadashiv Shivde’s book, *Maharajni Yesubai*, offers us a glimpse into Maharani Yesubai’s leadership qualities, her magnanimity, and her extraordinary powers of endurance.

नकारात्मक परिस्थितीतही आपले दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून दौलतीच्या हिताचे निर्णय येसूबाईंनी अतिशय निग्रहीपणे घेतले. छत्रपती संभाजी महाराजांनी ‘श्री सखी राज्ञी जयति’ या शिक्क्यातून येसूबाईंवर जो विश्वास दाखवला, त्यांनी तितक्याच धृतीपूर्वक सार्थ करून दाखवला. डॉ सदाशिव शिवदे यांच्या 'महाराज्ञी येसूबाई' या ग्रंथातून आपल्याला महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वगुणांचे, औदार्यांचे आणि कल्पनातीत सहनशक्तीचे दर्शन घडते.

In the chronicles of history, the credit of most events about the rise and fall of empires is given to the men who fought battles and occupied thrones. However, Maharani Yesubai is an excellent example of the women who, often behind the scenes, played an equally important role in sustaining what was created, through their courage, sacrifice and foresight.

इतिहासाच्या पानांमध्ये, साम्राज्यांचा उदय आणि अस्त यांशी संबंधित बहुतांश घटनांचे श्रेय सहसा युद्धे लढणाऱ्या आणि सिंहासनावर आरूढ होणाऱ्या पुरुषांना दिले जाते. मात्र, महाराणी येसूबाई हे अशा स्त्रियांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहेत ज्यांनी - अनेकदा पडद्यामागून राहूनही - आपल्या धैर्याने, त्यागाने आणि दूरदृष्टीने निर्माण केलेले राज्य टिकवून ठेवण्यात तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली.

This article was first published by the author on 28th November 2025 in Marathi print media
हा लेख सर्वप्रथम लेखिकेने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठी मुद्रित माध्यमात प्रकाशित केला होता.